डी.वाय.पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ कॅम्पसला कृषी मंत्री ना. दादाजी भुसे यांची भेट

0

राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी शुक्रवारी तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ कॅम्पसला भेट दिली. यावेळी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या कार्याचे व दूरदृष्टी नेतृत्वाचे कौतुक करत ना. दादाजी भुसे यांनी नवे विद्यापीठ शैक्षणीक प्रगतीमधील मोठा भागीदार बनेल असा विश्वास व्यक्त केला.
कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शुक्रवारी दुपारी तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ कॅम्पसला भेट दिली. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील व विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार सुजित मिणचेकर, डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. संजय पाटील यांनी विद्यापीठामध्ये राबविण्यात येणाऱ्या अनेक आधुनिक व नाविण्यपूर्ण संकल्पनांबाबत ना. दादाजी भुसे याना सविस्तर माहिती दिली. तसेच सेंद्रिय पद्धतीने घेण्यात आलेले विविध पिकांबद्दल व शेतीतील अनेक प्रयोगांबद्दल यावेळी सविस्तर चर्चा केली.
कॅम्पसमधील शेतीची सफर घडवत येथे घेतला जात असलेला भाजीपाला, फळपिके यांची माहिती कृषी मंत्र्यांना देण्यात आली. येथे विकसित करण्यात आलेल्या अत्याधुनिक डेअरी फार्मचे यावेळी ना. दादाजी भुसे यांनी विशेष कौतुक केले.
विद्यापीठाच्या भविष्यकालीन योजना, प्रस्तावित नवे अभ्यासक्रम, कृषितील विविध प्रयोग याबाबत ना. दादाजी भुसे यांना माहिती देण्यात आली. यावेळी कृषी मंत्री भुसे व अन्य मान्यवरांनी यशवंतराव पाटील यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन आशीर्वाद घेतले.
विद्यापीठ कॅम्पसची पाहणी केल्यानंतर कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी अत्यंत समाधान व्यक्त केले. डॉ. संजय डी. पाटील यांनी अत्यन्त मेहनतीने व दृरदृष्टी ठेवत तळसंदे सारख्या गावात नंदनवन फुलवले आहे. याच ठिकाणी डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ स्थापन करून कृषी व तंत्रज्ञान क्षेत्रांतील आधुनिक उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध केल्या आहेत. हे विद्यापीठ राज्याच्या शैक्षणिक विकासात महत्वाची कामगिरी पार पाडेल असा विश्वास ना. दादाजी भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply